स्त्रीने ठरवले तर... जेट जगदीश. (^j^)
निसर्गात कोणतीही गोष्ट साचून राहिली की सडते. प्रवाहीपणा व बदल हा निसर्गाचा नियम आहे. पण आपली जातिसंस्था, कुटुंबसंस्था, विवाहसंस्था समाजातील रूढी परंपरा गतकालानुगतिक जशाच्या तशा आहे व आतल्या आत सडत आहे. काळ बदलला तसे संदर्भही बदलले. या सर्वामध्ये बदल करून बदलत्या समाजरचनेप्रमाणे सुटसुटीत प्रवाहित व काळानुरूप करण्याची गरज आहे. म्हणूनच पुरुष वर्चस्व झुगारण्याची सुरुवात कुटुंबातील स्त्रियांनाच करावी लागेल. वैचारिक दुर्बलता मागे टाकून प्रगतीची उत्तुंग झेप सर्वसामान्यांनी घेण्यासाठी योनिशुचितेचे अवडंबर दूर करून नैसर्गिकतेने जगणे आवश्यक आहे. एखादी घटना घडली तर तो अपघात समजून योनिशुचितेला महत्त्व न देता सहजपणे इतर दुर्घटनांप्रमाणे त्याकडे बघावे. अर्थात त्यासाठी मानसिक तयारी करणे आवश्यक आहे.पण आजच्या आधुनिक काळातही आपल्या समाजात स्त्रीची समानता आभासीच आहे. जी काही थोडीफार समता व स्वातंत्र्य स्त्रीला दिलेले दिसते, ते शिक्षणाने आलेल्या समाजभानामुळे, स्त्रीला झालेल्या तिच्या मानवी हक्कांच्या जाणिवेमुळे व कायद्यामुळे आणि एकंदर जगातच वाहणाऱ्या स्वातंत्र्य, समता इत्यादी तत्त्वांच्या विचारप्रवाहामुळे. परंतु मुळात जाऊन पाहिले तर सरंजामी वृत्तीतून येणारी पुरुषी वर्चस्वाची मानसिकता व त्यातून निपजणारी विवेकहीनता बदललेली नाही. उलट अंत:करण हेलावून टाकणाऱ्या प्रसंगी ती वाढलेलीच दिसते आणि तिने नृशंस हिंसेचे रूपही घेतलेले दिसते.
आपल्या समाजातील परंपरागत धारणांमुळे पुरुषी वर्चस्वाच्या मानसिकतेचा परिपोष तर होतोच पण त्यातून स्त्रीबद्दल पुरुषांच्या ठायी असूया निर्माण झाली आहे ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. स्त्री तिला लाभलेल्या कायदेशीर स्वातंत्र्यामुळे, शिक्षणामुळे व अंगच्या गुणवत्तेमुळे जे नेत्रदीपक यश मिळवत आहे ते पुरुषांना आपल्या वर्चस्वाला बसलेला धक्का वाटतो. मी पुरुषांकडून स्त्रीच्या गुणवत्तेविषयी आदराऐवजी असूयेने भरलेली व स्त्री-स्वातंत्र्याच्या संतापाने खदखदणारी अनेक विधाने ऐकली आहेत. या रोषाचे प्रकटीकरण पुरुषी वर्चस्व जिथे हमखास दाखविता येईल अशा बलात्कारात व स्त्रीवरील हिंसाचारात होते. यावरील उपायांची सुरुवात स्त्रीने स्वत:पासूनच करायला हवी. पुरुषांनी केलेल्या विविध अन्याय व अत्याचारांपुढे ती मान का तुकवते? मुलांना घडविण्याचे काम स्त्रियांच्या हातात असते. तिने ठरवले तर पुरुषी वर्चस्वाची मानसिकता ती आपल्या कुटुंबात बदलू शकते. मात्र त्यासाठी स्वत:च्या मनातून ही पुरुषी वर्चस्वाची मानसिकता पुसून टाकावयाला हवी. पुरुषी वर्चस्वाची सुरुवात अगदी नवरा बायको एकमेकांना निवडतात तेथूनच होते. नोकरी करणारी स्त्री कायम घर आणि संसारही सांभाळते. या परंपरेला छेद दिला तरच पुरुषी वर्चस्वाची मानसिकता बदलू शकेल. त्यासाठी संपूर्ण जीवनशैलीच बदलली पाहिजे.
स्त्रियांनी आई झाल्यावर अगदी लहानपणापासूनच आपल्या मुलांना वाढवतांना मुलगा/मुलगी असा भेद खेळणी वा घरातील कामे यात करू नये. मुलांवर स्त्री ही एक व्यक्ती आहे , असे बिंबवून तिचा आदर करण्याचे संस्कार करायला हवेत. मुलींना मुलांसारखेच स्वसंरक्षणाचे बाळकडू पाजायला हवे. मुलांना 'तू बायल्या सारखा का वागतो ? हातात बांगड्या भरल्या आहेस का ? मुलीसारखा मळूमुळू काय रडतोस ?' अशाप्रकारचे स्त्रीला कमी लेखणारे, दुय्यम समजणारे आणि भेदभाव कारणारे संस्कार करू नयेत. वयात येणाऱ्या मुलामुलींना योग्य शब्दात शास्त्रीय माहिती दिली तर मुले, मुलींकडे फक्त शारीरिक दृष्टीने बघणार नाहीत. शारीरिक बदल ही एक नैसर्गिक घटना आहे आहे असे समजुन एकमेकांकडे निकोप दृष्टीने पाहायला शिकतील. घरातील मुलींना त्यांच्या आवडीचे शिक्षण दिले पाहिजे. शिवाय त्यांना शारीरिक सामर्थ्य कमावण्यासाठी, स्वत:चे संरक्षण स्वत:ला करता यावे यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे. शाळेमध्ये आठवडय़ातील काही तास मुलामुलींसाठी पाककलेचे दिले पाहिजेत. रोजच्या आहारातील खाद्यपदार्थ सर्व विद्यार्थ्यांना करता आलेच पाहिजेत. हा विषय सक्तीचा असावा. सायकल किंवा स्कूटर चालवणे, पोहणे ही कौशल्ये शाळेतच विकसित व्हावीत. त्यात मुलगा-मुलगी असा फरक केला जाऊ नये. मुलीचा व्यक्तिमत्त्व विकास झाला की तिला आपोआप समाज आदराने वागवेल. मुलाला लहानपणीच जर घरातील कामे करण्याची सवय लावली तर त्याची पुरुषी वर्चस्वाची मानसिकता आपोआप कमी होईल. अशाप्रकारे जर घरातच मुलामुलींना समान वागणूक देऊन वाढवले तर पुढच्या पिढीत बलात्काराचे प्रमाण नक्की कमी होईल.
No comments:
Post a Comment