Wednesday, 1 March 2017

शिवराय (आनंद शितोळे लिखीत)

हे लिहायचं बऱ्याच दिवसापासून डोक्यात होत.

आज शिवजयंती आहे म्हणून लिहिणं जास्त गरजेच आहे.

जेव्हा स्वार्थासाठी लोकांनी शिवाजी हे नाव चलनी नाणं म्हणून वापरणं सुरु केलंय त्या काळात लिहिणं अजून जास्त गरजेचं आहे.

असं म्हणतात चांगला सेनापती चांगला राजा असेलच असं नाही.

चांगला राजा चांगला सेनापती असेलच असं नाही.

युद्ध जिंकणं ,लढाया जिंकणं ह्यापलीकडं जिंकलेल्या राज्यातल्या माणसांची मनं जिंकणं अतिशय अवघड असतंय.

दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने युद्धकाळात प्रधानमंत्री म्हणून विन्स्टन चर्चिल ह्यांना निवडल होतं , मात्र युद्ध संपल्यावर झालेल्या निवडणुकीत त्यांना विजय मिळू शकला नाही.

शिवाजी महाराजांचं मोठेपण दिसून येतं ते इथंच.

आधी आणि नंतरही कदाचित युद्धशास्त्र, लढाईचा आवाका ह्या निकषावर त्यांच्यापेक्षा जास्त शूर, पराक्रमी राजे होऊन गेलेले असतील. मात्र युद्ध जिंकण्यापलीकडे काय करायला हवं ह्याचं अचूक भान असलेला राजा म्हणजे शिवाजी.

स्वप्न सगळेच पाहतात, काही लहान काही मोठे, काही आवाक्यातले काही आवाक्याबाहेरचे.

मात्र शहाजीराजांनी बघितलेलं स्वप्न अशक्यप्राय आणि प्रचंड मोठा आवाका असलेल होतं.

आपल्या भूमीवर आपलंच राज्य असावं, स्वराज्य असावं हे स्वप्न.

त्यासाठी त्यांनी मांडलेला राजकारणाचा पट आणि खेळ प्रचंड मोठा होता.

छोट्या निजामशहाला मांडीवर बसवून जुन्नरहून राज्यकारभार करताना त्यांनी केलेला प्रयोग अल्पकाळ टिकलेला असला तरीही त्यांच्या मनात काय आहे ह्याची चुणूक देणारा होता.

महाराष्ट्रात जिजाऊंनी शिवाजीराजांना घेऊन स्वराज्याचा पाया घालायचा, त्याला पाठबळ देण्याचं काम शहाजीराजे दक्षिणेत राहून करणार.

दक्षिणेत असलेले राजे आपल्या बाजूला वळवून घेऊन सगळ्यांची एकत्र मोट बांधून मग सगळा दक्षिण भारत दिल्लीच्या सत्तेच्या विरोधात उभा करून दिल्लीची सत्ता मोडून काढायची.

ह्या रणनीतीचा भाग म्हणून शिवाजी राजांनी गोवळकोंडा सारख्या राज्याशी मैत्री जोपासली, इतरही भागात जिथे राज्य जिंकली तिथले राजे कायम ठेवून मांडलिक बनवले.

शिवाजी महाराजांना दीर्घायुष्य लाभलं असतं तर कदाचित तरुण संभाजीराजांच्या मदतीने भारताच्या राजकारणाचा इतिहास बदलला असता.

पण इतिहासात जर तर ला स्थान नसतंय.

राजांच्या आयुष्यातल्या डोळे दिपवून टाकणाऱ्या घटना, अफजलखान वध, पन्हाळा सुटका , शाहिस्तेखान अथवा आग्र्याहून सुटका हे प्रसंग बाजूला ठेवून राजे बघितले तर मग त्यांचं व्यक्तिमत्व अजून उत्तुंग आणि भव्य दिसतं.

छोटे छोटे तपशील घेऊन अभ्यासले तरीही ज्या प्रदेशावर आपण राज्य करतोय त्या प्रजेला राज्य आणि राजा आपला वाटला पाहिजे ह्या भावनेतून त्यांनी सगळे निर्णय घेतले.

जुलमाचा रामराम घालून, पैशासाठी लढणारी फौज सगळ्याच राजांकडे होती मात्र हे राज्य आपलं आहे ह्या भावनेतून राजासाठी आणि राज्यासाठी हसत मृत्यूला कवटाळणारे जिगरबाज वीर निर्माण करणं आणि ती प्रेरणा माणसांच्या मनात निर्माण करणं हे खर राजेपण.

ही प्रेरणा निर्माण व्हायला एका रात्रीत झालेली नव्हती , एक एक छोटे छोटे निर्णय घेऊन त्यांनी रयतेच्या मनात विश्वास निर्माण केला आणि मग रयत तिथवर आली.

त्याचा परिपाक म्हणून संभाजी राजांच्या हत्येनंतर स्वराज्य बुडवायला महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेल्या औरंगजेबाला २७ वर्षे झगडून यश मिळालं नाही आणि दक्षिण जिंकण्याच स्वप्न अधूर ठेवून आलमगीराने नगरजवळ शेवटचा श्वास घेतला.

आरमाराची उभारणी, व्यापाराला परवानगी, शेतसारा, पीककर्ज, पाण्याची व्यवस्था, स्थैर्य अश्या प्रत्येक पातळीवर राजांचे निर्णय त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष देतात.

कुटुंब जोडलेलं असतंय घरातल्या स्त्रीशी जी सगळ्या घराला बांधून ठेवतेय.

राजांच्या आयुष्यातल्या तीन महत्वाच्या घटना.

रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा, हिरकणीचा केलेला सन्मान आणि दक्षिणेत सरदार स्त्रीची विटंबना झाली म्हणून आपल्या सरदाराना केलेली शिक्षा.

ह्या घटना डोळसपणे पाहणाऱ्या महाराष्ट्रातल्या स्त्रियांना आपला राजा नेमका कसा आहे हे समजलं आणि त्यांनी हे राजाच मोठेपण अनुभवून त्यांच्यावर विश्वास टाकला.

हाच विश्वास त्यांनी पुढल्या पिढ्यात संक्रमित केला म्हणून अवघा महाराष्ट्र शिवाजी-संभाजी महाराज नसतानाही मुगलांशी झुंजत राहिला.

माणसांच्या मनात राज्य आपलं आहे हा विश्वास निर्माण करणं आणि मग त्या माणसांनी राज्य आपलं म्हणून त्याचं रक्षण करणं ही त्याकाळातली अतिशय दुर्मिळ घटना महाराजांचं मोठेपण लखलखीतपणे पुढे मांडते.

ज्या काळात मुगल साम्राज्यात आणि सगळ्याच भारतात राज्यासाठी बाप पोराला, पोरगा बापाला अटकेत टाकून गादी बळकावत असताना मावळे मात्र आपल्या राजाच्या स्वप्नासाठी प्राण ओवाळून टाकत होते.

सध्याच्या काळात हे जास्त प्रकर्षाने जाणवतंय महाराजांनी माणसांना नेमकं कसं उभं केलं ते.

जिथे सरकार नावाची संस्था सगळं काही करेल आणि आपण मात्र बाजूला काठावर बसून गंमत पाहू अशी मानसिकता असलेल्या काळात राज्यासाठी लोकांनी प्राण दिले हे कदाचित लोकांना समजणार नाही आणि समजलं तरी पचणार नाही , झेपणार तर नाहीच नाही.

राष्ट्र मोठं होत ते सामान्य माणसांनी राष्ट्राला आपलं म्हणून त्याचं रक्षण करायला कृती केल्याने.

आजच्या काळात रक्षण करायला कुणाला ढाल तलवार घेऊन लढायला जायचं नाही तर ही लढाई आपल्याच मनात दडून बसलेल्या प्रवृत्तीशी आहे.

राष्ट्राची संपत्ती, राष्ट्राचा लौकिक, बौद्धिक संपदा ही आपलीच असून तीच जबाबदार नागरिक म्हणून वागून आपल्या कृतीने रक्षण केलं तर ती वृद्धिंगत होईल हाच धडा आजच्या दिवशी घ्यायला हवा.

अन्यथा फक्त पुतळे उभारून, स्मारक उभारून सोहळा साजरा केला आणि दुसऱ्या? दिवशी सगळ विसरून गेलो तर मग उपयोग नाही.

ही समज सगळ्यांना असेल तर कृतीत यावी, नसेल तर समज यावी ह्या शुभेच्छा !!

महाराष्ट्राच्या ह्या मानबिंदूला आणि मार्गदर्शकाला मानाचा मुजरा !!

साभार: आनंद शितोळे

No comments:

Post a Comment