'मराठा कोण ?'
मराठा बाणा / मराठा वृत्ती हा भारतीय राष्ट्रवादाचाच एक अविभाज्य भाग आहे आणि 'स्वराज्य' व 'मराठा साम्राज्य' यांची वैचारीक भूमी आहे. राजकीय विचार आहे . महाराष्ट्राची ही राजकीय ओळख आहे. भारतीय इतिहासाच्या संदर्भात 'मराठा' एक राजकीय एकक (political entity) आहे.
मराठ्यांची इतिहासविषयक कर्तबगारी व त्यामागील त्यांची राजकीय दृष्टी समजून घेताना, आंग्ल विद्वान ऑक्वर्थ साहेबांचे एक अवतरण महत्वाचे ठरते. मराठ्यांची भारतातील अन्य प्रांतीयांशी तुलना करुन ऑक्वर्थ लिहितात,
"Others in this country are knit together by other causes: they are castes, religious sects, tribes but Marathas are a Nation, and from Brahman to the Kunbi they glory the fact . "
'मराठा' ही संज्ञा 'राष्ट्र' म्हणून, व 'मराठा धर्म' ही संज्ञा
'राष्ट्रीयत्वाचा धर्म' म्हणून शिवक्रांती कालापासून विकसित व विस्तारीत होऊ लागली. ही 'मराठा' वृत्ती सर्वांनाच अभिमानाची होती. हा भारतीय राष्ट्रीयत्वाचा पहिला हुंकार होता. यामागे शिवरायांची प्रेरणा व राज्यकर्ते म्हणून मराठा समाजाने राजकारणाला, मुत्सद्दीगिरीला, लष्करीक्षेत्राला तसेच भाषा व्यवहाराला दिलेले निरपेक्ष व मोलाचे योगदान हे प्रमुख कारण होते.
भाषावार प्रांतरचनेच्या निमित्ताने, व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या अनुषंगाने महाराष्ट्र हे 'मराठी' राज्य असेल की 'मराठा' राज्य असेल असा शंकाकुल प्रश्न माडखोलकरांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना यशवंतराव चव्हाणांनी स्पष्ट केले होते की, 'मराठा हा जातिवाचक शब्द नाही; आचार्य अत्र्यांनी आपल्या वर्तमानपत्रास 'मराठा' नाव दिले ते काय 'जातिवाचक' होते ?'' असा सवालही केला होता .
महाराष्ट्राचा इतिहास ज्यांना नीट माहीत आहे आणि कळला आहे अशांना 'मराठा' शब्दाचा विकास व विस्तार होत होत तो राष्ट्रक (nationality) या धर्म -जातनिरपेक्ष राजकीय ओळखीपर्यंत कसा उन्नत होत गेला हे सहज उमगेल. लो.टिळकांनी सुरु केलेल्या इंग्रजी वर्तमानपत्राला जे 'मराठा' नाव दिले तेही राष्ट्रवाचकच होते. 'मराठा' शब्द केवळ जातवाचक नाही. किंबहुना 'मराठा' हा शब्द एक political entity म्हणून कसकसा विकसित होत गेला हे समजून घेतले तर त्याची व्यापकता समजून येईल. कोणतेही राष्ट्र भिन्न भिन्न धर्म, जाती, पंथ - उपपंथ, वर्ग यांनी मिळूनच साकार होते. म्हणूनच राष्ट्रक नावाची भूमी, प्रांगण राजकीय संघटनाला मुलभूत व व्यापक आधार प्राप्त व्हावा यासाठी आवश्यक असते. 'मराठा' या political entity ने ही भूमिका समर्थपणे यशस्वी केली ती बहुधर्मीय, बहुजातीय, बहुवर्गीय समूहाच्या सर्वसमावेशक एकत्रीकरणातून. 'मराठा' शब्दाला हीच व्यापक पार्श्वभूमी आहे . सुज्ञ इतिहासकारांनी शेकडो वर्ष याच अर्थाने 'मराठा राज्य', 'मराठा स्वराज्य' , 'मराठा साम्राज्य' संबोधले. इतिहास लेखणात मराठा शब्दाची हीच राजकीय ओळख आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासाबाबत न्या. रानडे म्हणतात,
"It is the History of the formation of a true Indian Nationality." "जेव्हा एकूण एक माणसाच्या ह्र्दयात राष्ट्रत्वाचे बीज पेरले जावे किंवा स्वत्वाचा भक्कम आणि खोल पाया बसावा, तेव्हाच असे अलौकिक पराक्रम घडून येतात ...."
आचार्य अत्र्यांचा 'मराठा', लो. टिळकांचा 'मराठा' व पुण्यात स्थापन झालेले 'मराठा' चेंबर ही निश्चितच राष्ट्रवाचक नावे आहेत. कोणीही दावा करु शकणार नाही की या संस्था 'मराठा' जातिचे प्रतिनिधीत्व करत होत्या .
ही नावे मराठा राज्य / राष्ट्र / महाराष्ट्र या संकल्पनेचे सूचक म्हणूनच निवडली गेली.
रविंद्रनाथ टागोर यांनी शिवरायांविषयी जे गौरवपूर्ण निबंध लिहीले त्यात ते म्हणतात, संपूर्ण भारतात ज्यांनी राष्ट्र ही संकल्पना समोर ठेऊन 'स्वराज्य' निर्माण कले ते एकमेव छत्रपती शिवाजी महाराज.
राष्ट्रनिर्मिती ही 'मराठा साम्राज्या' ची भूमी होती. त्यातूनच सर्वसमावेशक 'मराठा आत्मभान' विकसित होत गेले. त्याला मानवतेशी जोडणारी भूमिका महर्षी शिंदे यांनी मांडली ती सर्वार्थाने योग्य आहे, सर्व समूहास सामावून घेणारी आहे, जात, धर्म, पंथनिरपेक्ष आहे.
राष्ट्रकाच्याही पुढे जाणारा महर्षी वि. रा .शिंदे यांनी जो
'मराठा' शब्दाचा विचार मांडला तो प्रमाण मानला तर 'मराठा' एका अर्थाने मानवतेपर्यंत व्यापक होतो.
या 'मराठा' वृत्तीचे योग्य वर्णन शिंदे यांनी केले आहे .
जग हे नव्हे मराठ्यापुरते, पसरे ते अनाद्यनंती ।।
राहणीचे जे साधे, स्वार्थाबाहेर जे पाहती ।।
सत्याची भूक जयांना, अन्याया ते न सहती । ते सर्वस्वी अस्सल मराठे ।।
तात्पर्य ,
ज्यांची राहणी साधी असते, जे स्वार्थाच्या पलीकडे पाहतात, व ज्यांना सत्याची चाड आणि अन्यायाची चीड असते ते अस्सल मराठे असे शिंदे सांगतात.
मराठा जातीसमूहासहीत प्रत्येक मराठी माणसाने
'मराठा' शब्दाचा हा व्यापक अर्थ समजून घेतला आणि सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून निर्माण झालेल्या जात - धर्मनिरपेक्ष राष्ट्रीयतेचे भान ठेवले तर इतिहास लेखनास व आकलनास यापेक्षा योग्य अशी निरपेक्ष दृष्टी कोणती?
त्यासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आवाहन करतात,
"महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास म्हणजे ब्राह्मण आणि मराठे या दोन वीर बंधूंची संयुक्त कृती आहे. जसा त्या दोघांनी मिळून तलवारीला तलवार किंवा तलवारीला लेखणी भिडवून हा इतिहास निर्माण केला तसे आता यापुढे त्याचे शब्दचित्रही दोन्ही जातीच्या विद्वानांनी लेखणीला लेखणी भिडवून रेखाटले व रंगवले पाहिजे. पूढील चित्रपटाच्या रेखा वक्र होऊ नयेत व रंगात भेसळ होऊ नये यासाठी आतापासूनच दोघांनी सावधगिरी व श्रम घेण्यात कसूर करु नये."
सुरेश जाधव सर....
No comments:
Post a Comment