Friday, 17 March 2017

राम मंदीर देणगी (ज्ञानेश परब)

राम मंदिर उभारणीसाठी विहिंपने त्यावेळी १९८७ ते  ११९२ पर्यंत भारतातून आणि जगभरातून लोकांकडून प्रत्येकी कमीतकमी पन्नास रुपये असे जवळपास ५०० कोटी रुपये  जमा केले होते. विहिंपचे प्रमुख अशोक सिंघल होते. वरळी सी फेस ला एका आलिशान फ्लॅटमध्ये ते राहात होते.

त्यांच्यावर हिंदू महासभेचेच एक कार्यकर्ते, लेखक, सावरकरप्रेमी, तसेच पु.ना.ओक यांचे  सहकारी कै. जीवन कुलकर्णी यांनी या पैश्याविषयी खुले आम, पत्र लिहून आणि वर्तमानतपत्रातून विचारणा केली होती आणि माझ्या माहितीप्रमाणे केस टाकली होती. त्याविषयीचे डिटेल्स माझ्याकडे नाहीत.  आता  दुर्दैवाने श्री.जीवन कुलकर्णी हे बऱ्याच काळापूर्वी  कॅन्सरने वारले.

अशोक सिंघलसुद्धा काही वर्षांपूर्वी वारले. राममंदिर उभारणीसाठी पैसा कोठे गेला? त्याचा हिशोब काय? या विषयी ना कोणी मीडियाने/पत्रकारांनी याची दखल घेतली ना कोणी पक्षांनी, ना कोणी नेत्यांनी.....

एक  मात्र खरे त्या रामजन्मभूमी आंदोलनानंतर(बाबरी मशीद पाडल्यानंतर) १९९२ पासून  हिंदू आणि मुसलमान यांच्यांत २००२ च्या गोध्य्रा-गुजरात दंगली होईपर्यंत प्रचंड दंगली झाल्या....
दोन्ही बाजूकडचे हजारो लोक मेले, संपत्तीचे करोडो रुपयांचे नुकसान झाले

त्याचीच परिणीती भारतात अतिरेकी वादात, बऱ्याच बॉम्बस्फोटात झाली . हकनाक गरीब, दुर्दैवी सर्वसामान्य नागरिक(सर्वच धर्माचे.... अशा प्रसंगी कोणत्याही धर्माच्या  निरपराध माणसाचा मृत्यू होतो) मेले..... आणि दोन्ही धर्मांच्या लोकांमध्ये वितुष्ठ निर्माण झाले. भारतीय समाजात प्रचंड ध्रुवीकरण झाले....

याचा फ़ायदा मात्र भाजपाला चिक्कार झाला. १९८५ला केवळ दोन खासदार असलेल्या भाजपाला २९ वर्षात २०१४ साली एकहाती बहुमत २८२ खासदार एवढे संख्याबळ झाले......

लिबरहान आयोग, श्रीकृष्ण आयोग झाले, गोध्य्रा-गुजरात दंगलीवर सुद्धा चर्चा झाली, पण लोकांना  काही फरक पडला नाही. उलट मोदी आणि भाजप निवडून आले. 

त्यांना आता विकासाच्या नावाखाली सर्वच धर्मीय आणि जातीतील लोकांनी मत दिलीत....

आता तो  तरी खराखुरा विकास ते करतात का? हे मात्र जनतेला बघावे लागणार आहे.

Wednesday, 1 March 2017

बंडखोर मी....

मी जन्माने हिंदू
माझे आई-बाप पण जन्माने हिंदू .
त्यांचे आई-बाप पण जन्माने हिंदू .
त्यांचेही आई-बाप पण जन्माने हिंदू .
कोणतेही कर्तृत्व,पराक्रम न गाजवता,
आमच्या कुळाला धर्म मिळाला “हिंदू”.
माझ्या खापरपंजोबानं, पणजोबानं,
धर्मात जे सांगितलय ते केलं.
त्यांनी धर्मग्रंथ वाचला नव्हता.
वाचायचा संबधच नव्हता.
त्यांनी फक्त धर्माबद्दल ऐकलं होत.
त्यांनी जे ऐकल तेच पुढे सांगितलं.
त्यांनी ऐकलं तेहतीस कोटी देव आहेत.
मग तेही सांगायला लागले,
तेहतीस कोटी देव आहेत.
त्या प्रत्येक देवाचा वेगळा वार.
त्या प्रत्येक देवाला वेगळा नैव्यदय.
त्या प्रत्येक देवाला वेगळी फुल.
काही देवांना गोडधोड पंचपक्वान्न,
तर काही देवांना तांबडया-पांढऱ्या रश्याच
बकर-कोंबड, अंड.
काही देवांना शुद्ध पंचामृत,
तर काही देवांना पहिल्या धारेची शुद्ध दारु.
सोबत गांज्या आणि चिलिम.
खापरपणजोबा आणि पणजोबा
यांनी जे जे ऐकल ते ते केल,
तेच आजोबांना सांगितलं.
पण इथ थोडी गडबड झाली.
त्यांनी आजोबांना शाळेत घातलं होत.
अक्षर ओळख होताच आजोबा विचार करायला लागले.
मग, धर्माबद्दल त्यांना त्यांच्या वडलांनी आणि आजोबांनी जे
सांगितलं त्याबद्दल प्रश्न विचारायला लागले.
देव्हाऱ्यातल्या देवाचे लाड न करता दोन हात तिसर मस्तक टेकवून
नमस्कार करू लागले.
माझ्या वडलांनी पण त्यांच्या वडलांनी जे केलं तेच केलं.
किंबहुना फक्त देवच देव्हाऱ्यात ठेवले.
मग आता आली माझी वेळ.
यासर्वांपेक्षा मी थोडी जास्त शिकले.
थोडी जास्त बाहेर फिरले.
थोडी जास्त वाचायला लागले.
थेट पणे प्रश्न विचारायला लागले.
तेव्हा लक्षात आल.
माझ्या आजोबांनी आणि वडलांनी काहीप्रमाणात देव-धर्म नाकारला.
त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापुरता मर्यादीत ठेवला.
सार्वजनिक आयुष्यात देव-धर्माला साध डोकावून सुद्धा दिल नाही.
मग आता मी काय करते,
तर आजोबा आणि वडील यांच्या एक पाऊल पुढे टाकून
केवळ सार्वजनिकच नाही तर वैयक्तिक आयुष्यात सुद्धा
देव-धर्म ठामपणे आणि विचारपूर्वक नाकारते.
कारण,
अमुक-तमुक देवाचा उपवास करून,
अमुक-तमुक देवाला नवस बोलून,
अमुक-तमुक देवाला पायी फेऱ्या मारून,
अमुक-तमुक देवाला बकर-कोंबड, दारू-गांज्या वाहून,
अमुक-तमुक देवाला तोरण वाहून,
अमुक-तमुक देवाच्या पोथ्या वाचून.....
माझ्या आयुष्यातला एकही प्रश्न सुटणार नाही.
किंवा त्याच्या देवळात लोटांगण घातलं म्हणून
माझं काही भलही होणार नाही, हे मला पूर्णतः समजलं.
देव-धर्म यांच्या नावावर स्वताची पोट भरणाऱ्या
दुकानदारांच्या आयुष्याचे प्रश्न सुटणार, त्यांच भलं होणार
आणि ते पुन्हा भोळ्या-भाबडया भाविकांचे शोषण करणार
हे मला पूर्णतः समजले.
आणि म्हणूनच मी थेट प्रश्न विचारायला लागले.
अगदी साधे प्रश्न.....
१. देवाला त्याच्या हाताने का जेवता येत नाही.
२. देवाला किंमती वस्तू का लागलात.
३. देवाच्या देवळाला आणि तिथे ठेवलेल्या दानपेटयाना कुलूप का लावावं लागत.
४. देवाचा जन्म बाईच्या पोटी झाला तर त्याला तिचाच का विटाळ होतो.
५. ब्रह्मचारी असणाऱ्या देवांचा त्यांच्या ब्रम्ह्चर्यावर विश्वास नाही का.
६. देवाला अवतीभवती काय सुरु आहे हे दिसत नाही का.
७. देवाकडे काही मागितल्यास त्याला त्याचा मोबदला का दयावा लागतो.
८. देवाला हार-फुल, पंचपक्वान्न का लागतात.
९. देव श्रीमंतांवर कृपादृष्टी का करतो.
१०. देवाच्या दारात सगळ्यात जास्त भिकारी का असतात.
यांसारखे साधे प्रश्न मी आता विचारते.
पण हे प्रश्न विचारले की, देव-धर्माच्या दुकानदारांची गोची होती.
कारण त्यांच्याकडे उत्तरच नसत.
मग ते काय करतात? काय करतात काय विचारता?
अहो, ते पाठीमागून गोळ्या झाडतात, भ्याडासारख्या...
त्यांनी चार्वाकाला संपवल,
त्यांनी शंबूकाला संपवलं,
त्यांनी सॉक्रेटीसला संपवलं,
त्यांनी तुकारामाला संपवलं,
त्यांनी डॉ. दाभोलकरांना संपवल,
त्यांनी कॉ. पानसरेंना संपवलं,
आज त्यांनी प्रा. कलबुर्गींना संपवलं,
आणि आता ते उदया मला हि संपवतील,
मलाच काय तर प्रश्न विचारणाऱ्या
आणि प्रश्न विचारायला शिकवणाऱ्या प्रत्येकाला
ते संपवतील.
पण, त्यांना काय माहीत प्रश्न विचारणारे
आणि प्रश्न विचारायला शिकवणारे घाबरत नाहीत.
गोळ्या घालणाऱ्यानों तुम्हाला सांगणे एकच,
असेल हिमंत तर समोरून गोळ्या घाला.
गोळ्या संपतील,
पण प्रश्न विचारणारे आणि विचारायला शिकवणारे नाही.

------------अश्विनी सातव-डोके.

सोबत

सोबत

आजकाल कुणाशीही बोलावसं वाटत नाही. खूप खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहरे. ज्याची पाठ फिरेल त्याची निंदा करणारे. ह्यांची मानसिकता इतकी चीप असते ना की नको वाटतं …

इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात? ह्यात आपले लोक पण असतात हे विशेष!

ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला एडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका नकाराने बदललेले बघितले आणि वाटलं, ‘आपण एकटे असतो तेच बरं असतं.’

ह्यांच्यापेक्षा पुस्तकांमध्ये आणि छंदामध्ये रमावं, मन प्रसन्न राहतं आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता…

कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो. त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते.

प्रत्येकाचे मूड्स संभाळण, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो. सतत दुसऱ्यांचा विचार करताना आपल्याला “स्वतःला काय हवं आहे” हा प्रश्न कधी मागे राहतो हे काळतच नाहि. आपण इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही.

मग अशा वेळी प्रश्न पडतो “हे सगळं कशासाठी?”

खूप विचार केला की ह्या प्रश्नाचे एक उत्तर असं मिळतं ते म्हणजे – “आपण एकटेपणाला घाबरतो.”

सुरक्षतेसाठी कळपात राहिलं पाहिजे हि एक चुकीची मानसिकता आपल्यात रुजलेली असते. एकटे पडू या भीतीमुळे अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो. मनात नसूनही अनेक गोष्टी स्वीकारत जातो. मोठे होतो पण “सोबत”, “मैत्री” ह्या गोष्टींचे आणि नात्यांचे खरे अर्थ विसरतो.

लोकांनी शरीराने आपल्या सोबत असण्याला “सोबत” असं गोंडस नाव देतो. आपणही तसेच खोटे वागत जातो, पण एक क्षण असा येतो जेव्हा हा माणसांचा गोतावळा नकोस होतो.

मोजकीच पण चांगली माणसं हवीत असं वाटू लागतं. ह्या मुखवट्या मागचे चेहरे भेसूर वाटू लागतात आणि आपण पुन्हा स्वतःकडे वळतो. जाणीवेचा एकच क्षण असतो आणि तो आपल्या हातून कधीच निसटू द्यायचा नसतो.

‘मी उत्तम तेच करीन आणि चांगल्या लोकांच्या सोबतीतच राहीन’ असा मनाशी निश्चय केला की आपली निवड बदलत जाते आणि पर्यायाने आयुष्यही बदलतं. मोजकीच पण प्रेमळ, आपल्याशी प्रामाणिक भावनेने जोडलेली, वेळ प्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी –

“सोबत…!”

*_माणसांच्या गर्दीत चालताना आपला दीपस्तंभ कुणाला मानायचं हे आपणच ठरवायच_*

🅱✍8⃣8⃣8⃣8⃣

गैरसमज शंभूराजांबद्दलचे

इतिहास संशोधक मु. गो. गुळवणी -----

संभाजीराजे यांचे बद्दलचे गैरसमज अभ्यास करून दूर करणारे लेखन करणारे इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी यांचे आज पुण्यस्मरण
खालील मजकूर (फेस बुक --संभाजी राजे(The Great Maratha)December 17, 2013 मधुन )
मुरलीधर गुप्ते अर्थात कवी बी यांनी कमळा हे दिर्घकाव्य लिहून शंभुराजेंच्या तथाकथित प्रेयसीला इतिहासात अजरामर केले आहे. काही चित्रपटकारानी शंभुराजेंच्या चरित्रावर चिखलफेक करण्यासाठी हा चित्रपट बनवला. या चित्रपटाने शंभुराजेंच्या चरित्राबद्दल असलेला गैरसमज साक्षर विश्वापासून थेट जनमानसांसमोर पद्धतशीरपणे पोहचवला.
आजही कोल्हापूरजवळ पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणार्या एका समाधी मंदिरास कमळेचे मंदिर म्हणून संबोधले जाते. कमळेचे हे स्थायी मंदिर वर्षानुवर्षे शंभुराजेंची बदनामी करीत आहे. या गैरसमजाच्या मुळाशी जाणे आवश्यक होते म्हणून मु. गो. गुळवणी यांनी शोधनिबंध लिहिला आणि सत्य समोर आले की सज्जाकोटीच्या खाली असलेल्या आपटी गावातील हे थडगे दुसर्या संभाजी राजांच्या ( राजाराम पुत्र ) काळातील करवीर दरबारातील सरदार यशवंतराव थोरात व त्यांची पत्नी गोहाबाई यांचे समाधी मंदिर आहे. तहसील कार्यालयात याची नोंद आहे, सर्व्हे नं १९७, क्षेत्र १ एकर १५ गुंठे, खराब ३ गुंठे, आकार ३ रुपये ४ आणे. जमिनीचा वहिवाटदार म्हणून श्री आप्पा धोंडी कदम यांचे नाव असून ३ गुंठे खराब जमिनीवरील हे थडगे थोरातांचे थडगे म्हणून कागदोपत्री नोंद आहे. सरदार यशवंतराव थोरात जेव्हा लढाईत भाला लागून धारातीर्थी पडले, तिथेच त्यांची पत्नी गोहाबाई सती गेल्या. थोरात घराण्यातील लोकांनी पती पत्नीचे स्मरण म्हणून हे समाधी मंदिर बांधले. हे श्री गुळवणी यांनी सिद्ध केलंय. यावरून असे लक्षात येते की, कमळा हे काल्पनिक पात्र ही काही इतिहासकार आणि नाटककारांची हरामखोरी आहे
**************************

स्त्रीने ठरवले तर.....

 

स्त्रीने ठरवले तर... जेट जगदीश. (^j^)

निसर्गात कोणतीही गोष्ट साचून राहिली की सडते. प्रवाहीपणा व बदल हा निसर्गाचा नियम आहे. पण आपली जातिसंस्था, कुटुंबसंस्था, विवाहसंस्था समाजातील रूढी परंपरा गतकालानुगतिक जशाच्या तशा आहे व आतल्या आत सडत आहे. काळ बदलला तसे संदर्भही बदलले. या सर्वामध्ये बदल करून बदलत्या समाजरचनेप्रमाणे सुटसुटीत प्रवाहित व काळानुरूप करण्याची गरज आहे. म्हणूनच पुरुष वर्चस्व झुगारण्याची सुरुवात कुटुंबातील स्त्रियांनाच करावी लागेल. वैचारिक दुर्बलता मागे टाकून प्रगतीची उत्तुंग झेप सर्वसामान्यांनी घेण्यासाठी योनिशुचितेचे अवडंबर दूर करून नैसर्गिकतेने जगणे आवश्यक आहे. एखादी घटना घडली तर तो अपघात समजून योनिशुचितेला महत्त्व न देता सहजपणे इतर दुर्घटनांप्रमाणे त्याकडे बघावे. अर्थात त्यासाठी मानसिक तयारी करणे आवश्यक आहे.पण आजच्या आधुनिक काळातही आपल्या समाजात स्त्रीची समानता आभासीच आहे. जी काही थोडीफार समता व स्वातंत्र्य स्त्रीला दिलेले दिसते, ते शिक्षणाने आलेल्या समाजभानामुळे, स्त्रीला झालेल्या तिच्या मानवी हक्कांच्या जाणिवेमुळे व कायद्यामुळे आणि एकंदर जगातच वाहणाऱ्या स्वातंत्र्य, समता इत्यादी तत्त्वांच्या विचारप्रवाहामुळे. परंतु मुळात जाऊन पाहिले तर सरंजामी वृत्तीतून येणारी पुरुषी वर्चस्वाची मानसिकता व त्यातून निपजणारी विवेकहीनता बदललेली नाही. उलट अंत:करण हेलावून टाकणाऱ्या प्रसंगी ती वाढलेलीच दिसते आणि तिने नृशंस हिंसेचे रूपही घेतलेले दिसते.

आपल्या समाजातील परंपरागत धारणांमुळे पुरुषी वर्चस्वाच्या मानसिकतेचा परिपोष तर होतोच पण त्यातून स्त्रीबद्दल पुरुषांच्या ठायी असूया निर्माण झाली आहे ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. स्त्री तिला लाभलेल्या कायदेशीर स्वातंत्र्यामुळे, शिक्षणामुळे व अंगच्या गुणवत्तेमुळे जे नेत्रदीपक यश मिळवत आहे ते पुरुषांना आपल्या वर्चस्वाला बसलेला धक्का वाटतो. मी पुरुषांकडून स्त्रीच्या गुणवत्तेविषयी आदराऐवजी असूयेने भरलेली व स्त्री-स्वातंत्र्याच्या संतापाने खदखदणारी अनेक विधाने ऐकली आहेत. या रोषाचे प्रकटीकरण पुरुषी वर्चस्व जिथे हमखास दाखविता येईल अशा बलात्कारात व स्त्रीवरील हिंसाचारात होते. यावरील उपायांची सुरुवात स्त्रीने स्वत:पासूनच करायला हवी. पुरुषांनी केलेल्या विविध अन्याय व अत्याचारांपुढे ती मान का तुकवते? मुलांना घडविण्याचे काम स्त्रियांच्या हातात असते. तिने ठरवले तर पुरुषी वर्चस्वाची मानसिकता ती आपल्या कुटुंबात बदलू शकते. मात्र त्यासाठी स्वत:च्या मनातून ही पुरुषी वर्चस्वाची मानसिकता  पुसून टाकावयाला हवी. पुरुषी वर्चस्वाची सुरुवात अगदी नवरा बायको एकमेकांना निवडतात तेथूनच होते. नोकरी करणारी स्त्री कायम घर आणि संसारही सांभाळते. या परंपरेला छेद दिला तरच पुरुषी वर्चस्वाची मानसिकता बदलू शकेल. त्यासाठी संपूर्ण जीवनशैलीच बदलली पाहिजे.

स्त्रियांनी आई झाल्यावर अगदी लहानपणापासूनच आपल्या मुलांना वाढवतांना मुलगा/मुलगी असा भेद खेळणी वा घरातील कामे यात करू नये. मुलांवर स्त्री ही एक व्यक्ती आहे , असे बिंबवून तिचा आदर करण्याचे संस्कार करायला हवेत. मुलींना मुलांसारखेच स्वसंरक्षणाचे बाळकडू पाजायला हवे. मुलांना 'तू बायल्या सारखा का वागतो ? हातात बांगड्या भरल्या आहेस का ? मुलीसारखा मळूमुळू काय रडतोस ?' अशाप्रकारचे स्त्रीला कमी लेखणारे, दुय्यम समजणारे आणि भेदभाव कारणारे संस्कार करू नयेत. वयात येणाऱ्या मुलामुलींना योग्य शब्दात  शास्त्रीय माहिती दिली तर मुले, मुलींकडे फक्त शारीरिक दृष्टीने बघणार नाहीत. शारीरिक बदल ही एक नैसर्गिक घटना आहे आहे असे समजुन एकमेकांकडे निकोप दृष्टीने पाहायला शिकतील. घरातील मुलींना त्यांच्या आवडीचे शिक्षण दिले पाहिजे. शिवाय त्यांना शारीरिक सामर्थ्य कमावण्यासाठी, स्वत:चे संरक्षण स्वत:ला करता यावे यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे. शाळेमध्ये आठवडय़ातील काही तास मुलामुलींसाठी पाककलेचे दिले पाहिजेत. रोजच्या आहारातील खाद्यपदार्थ सर्व विद्यार्थ्यांना करता आलेच पाहिजेत. हा विषय सक्तीचा असावा. सायकल किंवा स्कूटर चालवणे, पोहणे ही कौशल्ये शाळेतच विकसित व्हावीत. त्यात मुलगा-मुलगी असा फरक केला जाऊ नये. मुलीचा व्यक्तिमत्त्व विकास झाला की तिला आपोआप समाज आदराने वागवेल. मुलाला लहानपणीच जर घरातील कामे करण्याची सवय लावली तर त्याची पुरुषी वर्चस्वाची मानसिकता आपोआप कमी होईल. अशाप्रकारे जर घरातच मुलामुलींना समान वागणूक देऊन वाढवले तर पुढच्या पिढीत बलात्काराचे प्रमाण नक्की कमी होईल.

चर्चा: स्त्री-पुरुष संबंधांची

*काही चर्चाः स्त्री-पुरुष संबंधांची*

- सुरेश सावंत
________________

प्रेम आणि संभोग यात आधी काय? अर्थात प्रेम. स्त्री-पुरुष संबंधांविषयीच्या जाणिवा सुरु झाल्या झाल्या हे उत्तर माझ्या मनात कोरलं गेलं ते आजपर्यंत. म्हणजे बुद्धी काही वेगळं नमूद करत असली, तरी अंतर्यामी हेच उत्तर ठाम असतं. ज्याच्याशी प्रेम, त्याच्याशीच लग्न आणि लग्नानंतरच संभोग हा क्रमही मनात अढळ असतो. आधी ‘आयुष्यात प्रेम हे एकदाच होतं’ या मताचा मी होतो. पुढे स्वानुभवातून हे मत बदलले. पण हा क्रम ढळला नाही.

पशू-पक्ष्यांच्यात कुठे असतं असं आधी प्रेम आणि मग संभोग? प्रणयाराधन वगैरे काहींच्यात असतं; पण त्याला माणसांच्यात असतं तसलं प्रेम म्हणणे कठीण आहे. लग्न तर त्यांच्यात नसतंच. जोडीदारही एकच नसतो. नर व मादी एवढंच नातं त्यांच्यात असतं. माणूस हा प्राणी आहे. प्राणी म्हणून त्यालाही हीच लक्षणे लागू होतात. पण विकासक्रमात त्याने काही संकेत, नीतिनियम बनविले आणि तो प्राण्याचा संस्कारित ‘माणूस’ झाला. आपल्या नर-मादी या प्राणी पातळीवरील प्रेरणांचे त्याने नियमन केले. समाजस्वास्थ्याच्या तत्कालीन निकषांस ते आवश्यक होते.

या संकेत-नीतिनियमांच्या प्रभावाखालील कोणी एकजण सोडून गेलेल्या तिला ‘खुश रहे तू सदा, ये दुआ है मेरी..’ असा निरोप देत होता. पण त्याचवेळी दुसरा एकजण म्हणत होता, ‘तू अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, किसी और को चाहोगी तो मुश्कील होगी.’ तर तिसरा ‘तू हां कर या ना कर, तू है मेरी किरण’ असे बजावत होता.

या तिन्हींमधील पहिला ती सोडून गेली तरी आयुष्यभर तिच्यासाठी देवदास बनायला तयार आहे. तिला तो कोणतीही अट घालत नाही. दुसऱ्याचीही आयुष्यभर एकटे राहण्याची तयारी आहे; पण अट एकच-तिने तसेच राहायला हवे. तिसरा तर त्यालाही तयार नाही. तिची संमती असो अथवा नसो; ती त्याचीच असणार हे त्याने ठरवून टाकले आहे.

हे तिघेही प्राणी पातळीच्या पुढे आहेत. म्हणजे, केवळ मादी म्हणून संभोगासाठी त्यांना कोणतीही स्त्री नको आहे. त्यांना आवड-निवड आहे. त्यांना तिच्याशी लग्न करायचे आहे. म्हणजे तिला जन्माचे जोडीदार करावयाचे आहे. तिच्याशी लग्नानंतरच संभोग करावयाचा आहे. विकासक्रमात एवढी प्रगती त्यांची झाली आहे. पण पहिला सोडला तर उरलेले दोघे स्वतः घेत असलेले हेच निवडीचे स्वातंत्र्य स्त्रीला देत नाहीत.

तिसरा तिला प्राप्त करण्यासाठी काहीही करायला, हिंसक व्हायला तयार आहे. त्याच्या या हिंसकतेला कायदा पाठिंबा देत नाही. तो त्याला अटकाव करतो किंवा शिक्षा देतो. पण कायद्याने दुसऱ्यालाही निवडीचे स्वातंत्र्य द्यायचा संस्कार होतो असे नाही.

विकासाच्या धारेत न सापडल्याने प्राण्यांच्यात गरीब-श्रीमंत, दलित-सवर्ण अशा श्रेणी नाहीत. माणसांच्यात या व अशा असंख्य श्रेणी, भेद आहेत. त्यामुळे वरील तिघांनाही त्यांचे संदर्भ आहेत. पहिल्याला सोडून गेलेली ती, तिला तो आवडला नाही किंवा त्याचे तिला काही खटकले, म्हणूनच सोडून गेली असेल असे नाही. ती जात किंवा आर्थिक किंवा अन्य कोणा श्रेणीने वरची असू शकेल. त्यामुळे तिच्या घरच्यांच्या धाकाने-भीतीने ती मागे सरली असेल.

या श्रेणींच्या, संकेत-नीतिनियमांच्या अधिकृत चौकटीबाहेरही बरेच काही चालत असते. संकेत-कायदा काहीही असला तरी त्यात फरक पडत नाही. या चौकटीबाहेरच्याला मन मानायला तयार नसले, तरी बुद्धीला ते स्वीकारावंच लागतं.

माझ्याही मनात उन्नत-उदात्त भावनांच्या व जगण्याच्या चौकटी होत्या; आहेत. त्यातील काही मोडताना बघताना त्रास झाला; आजही होतो. पण काही मोडल्या जात आहेत, याने बरेही वाटते. आनंदही होतो. समाज केवळ एका व्यक्तीच्या अथवा गटाच्या इच्छेनुसार चालत नाही. अशा अनेकांच्या इच्छा-हितसंबंधांच्या, भौतिक बदलांच्या संघर्षांतून नातेसंबंधांची, नीतिनियमांची जुनी रचना मोडत असते. नवी आकार घेत असते. घरात कुरबूर करत नवं घर करायला नवऱ्याला भाग पाडणाऱ्या सुनेबद्दल सासूची तक्रार असते. पण याच सासूने (सरंजामशाही मोडून शहरी उद्योगांना जन्म देणाऱ्या भांडवलशाही रचनेच्या पार्श्वभूमीवर) भला थोरला एकत्र कुटुंबाचा वाडा निरनिराळी कारणे सांगून नवऱ्याला सोडायला लावलेला असतो, हे ती विसरते. नवऱ्यांची अशी उघड कुरबूर नसली, तरी असे विभक्त होणे त्यांनाही हितकारकच असते. त्यामुळे ते थोडे आढेवेढे घेत किंवा साळसूदपणे बायकोच्या मागे दडून या वेगळे होण्याला पाठिंबाच देत असतात. हा व्यक्तींच्या इच्छाआकांक्षांच्या टकरावाच्या रुपात होणारा व्यवस्थात्मक बदल असतो. याचा अर्थ हे सगळंच वस्तुनिष्ठ, म्हणजे माणसाच्या हाती काहीच नसतं असं नव्हे. असंख्य आत्मनिष्ठांच्या गलबल्यातून जे निरपेक्ष घडताना दिसते, त्याच्या दिशेची जाण असणाऱ्या व्यक्ती अथवा गट त्यात हस्तक्षेप करु शकतात. करत असतात. दिशा पूर्ण बदलता येत नसली, तरी तिच्यातीलच काही वाऱ्यांचा उपयोग करुन आपले शिड त्यांना अनुकूल ठेवता येते व नौकेला गती देता येते. म्हणजेच बदलाची दिशा उपकारक करायचा प्रयत्न करायचा असतो. नाहीच झाली उपकारक तरी तिची हानिकारकता तरी कमी करता येते.

मी प्रेम प्रकरणांत (तथाकथित) आदर्शवादी असलो, तरी माझ्या गावात किंवा मुंबईतील राहत्या वस्तीत स्त्री-पुरुष संबंधांचे जे चोरटे व्यवहार दिसत होते, ते या आदर्शांना धक्का देणारे होते. यात नवरा कामावर गेला की गुपचूप घरात येणारा प्रियकर होता. चुलत बहीण-भाऊ होते. वयात अंतर असलेले होते. जाती-धर्म वेगळे असलेले होते. अशी प्रकरणे उघड झाल्यावर चिडून मारहाणही होत असे. भावकी-गावकीत ही प्रकरणे जाऊन त्यांत न्याय व दंडही होई. काही बायकांना नवरे सोडूनही देत किंवा तीच प्रियकराबरोबर निघून जाई. काही नवरे हे सगळे समजून कानाडोळा करत. त्याच्यासहित संसार चालू ठेवत. मूल कोणाचे हे प्रश्नांकित असले किंवा आपले नाही हे कळले, तरी त्याचा सांभाळ करत. अर्थात, असे पुरुष बहुधा ‘नामर्द’ संज्ञेला पात्र ठरत. जो बाईला हाकलून देतो, मारतो तो ‘मर्द’ असतो. या सगळ्यात ‘बाईची अब्रू’ ही केंद्रवर्ती असते. बाहेरख्याली पुरुषाला दूषणे दिली गेली, तरी समाजाच्या लेखी तो अखेर ‘पुरुष’ असतो. भांडं तडकतं ते बाईच्या शीलाचं. पुरुषाचं भांडं तांब्याचं असतं. त्याला पोच येतात; पण ते तडकत नाही. स्त्रीची योनिशुचिता महत्वाची; पुरुषाला शिश्नशुचितेची गरज नसते.

जगात लैंगिकतेच्या आदिम प्रेरणेला संस्कृतींनी काळाच्या निरनिराळ्या टप्प्यावर निरनिराळ्या प्रकारे समजून घेतले. खजुराहो किंवा अनेक प्राचीन देवळांतली संभोगशिल्पे याची साक्ष देतात. घुंघट किंवा बुरख्यातच सगळं झाकून ठेवायचं हीच एक सलग संस्कृती नव्हती. सध्या चालू असलेल्या समलिंगी संबंधांच्या मान्य-अमान्यतेची चर्चा ही किती मागास आहे, हे या शिल्पांवरुनही कळते. लैंगिक निवडीचा कल व स्वातंत्र्य ही मानवजातीला नवी गोष्ट नाही. इतिहास ३६० अंशांत माघारी फिरत नसला, तरी त्याला वेडीवाकडे वळणे असतात. जुने प्रगत आज मागास ठरण्याचे हे एक वळण एवढेच.

या मागासपणाला हल्ली जोरदार तडाखे बसू लागले आहेत, हे नक्की. समलिंगी संबंधीय उघडपणे पुढे येऊन झगडा देत आहेत. त्यांच्या बाजूने समाजातील अन्य लोकही ठामपणे उभे राहत आहेत. साहित्य-सिनेमांत हे विषय मांडले जात आहेत. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांना विरोधही होतो. पण त्या विरोधांतूनही ते टिकाव धरत आहेत.

नवी पिढी खूपच मोकळी दिसते आहे. त्यांचा सार्वजनिक ठिकाणचा वावर लिंगनिरपेक्ष म्हणावा, इतका मोकळाढाकळा असतो. जुन्या मानसिकतेतून जर आपण त्यांच्या जोड्या ठरवू लागलो, तर आपली फसगत होईल. पण या मोकळेढाकळेपणाचाच एक भाग म्हणून शारीरिक संबंध हीही बाब त्यांतील अनेकांना सहज वाटते. त्यासाठी प्रेमात असण्याची गरज त्यांना वाटत नाही. परस्परांना बांधून घेण्यात त्यांना स्वारस्य नाही. लग्न ही स्वतंत्र गोष्ट. तिच्याशी आधीच्या या व्यवहाराचा संबंध असेलच असे नाही. कोणी लग्न न करता सहजीवन पत्करतील; तर कोणी लग्न करतील. इन्स्टंट लग्न-इन्स्टंट घटस्फोट हाही या इन्स्टंट व्यवहाराच्या गाड्याचे मागचे अपरिहार्य चाक. मोकळेपणाचे स्वागत करताना नात्यातली ही इन्स्टंटता काळजी वाटायला लावणारी आहे. दुसरी एक काळजी करण्याची बाब म्हणजे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची गती अधिक असणे. विषमता, दुय्यम दृष्टिकोण यांची शिकार होत असतानाही गावातील बचतगट, राजकारण यात हिरिरीने उतरणाऱ्या सामान्य स्त्रीपासून आर्थिक-शैक्षणिकदृष्ट्या वरच्या स्तरातील स्त्रीपर्यंत सर्वत्र हा अनुभव येतो. मनासारखा पुरुष जोडीदार मिळत नसल्याने निवडीच्या निकषांशी तडजोड न करणाऱ्या अनेक मुलींची लग्ने लांबणीवर पडताना दिसतात. काही जणी अविवाहित राहणे पत्करतात. पसंत करतात. पुरुषांनी स्त्रियांच्या तुलनेत आपल्याला गतिमान नाही केले, तर हा पेच आणखी वाढेल.

स्त्री-पुरुष समतेची वाट अजूनही बिकट आहे हे खरे. पण शरीरसंबंधातून नैतिकता मोजण्याच्या ढोंगातून नवी पिढी मोकळी होते आहे, त्याचे स्वागतच करायला हवे. पण त्याचवेळी माणूसपणाचे अविभाज्य अंग असलेले स्त्री-पुरुष जोडीदारांमधले तरल प्रेम, परस्पर विश्वास यातूनच शारीरिक मीलनातील समर्पणाचा अत्युच्च आनंद गाठता येतो, याचे त्यांचे भान सुटता कामा नये. आजच्यासारखी कुटुंबव्यवस्था पुढे तशीच राहील, याची खात्री नाही. कारण साधा तर्क-आजच्यासारखी पूर्वी ती नव्हती. मानवी विकासक्रमात तिच्यात बदल होत आलेत. पुढेही होतील. पण ही जी काय नातेसंबंधांची नवी व्यवस्था होईल, ती जबाबदार, निकोप व सुंदर असायलाच हवी, यात दुमत असायचे कारण नाही.

म्हणजेच, प्रेम, लग्न, संभोग यातला क्रम मानवी विकासाच्या आजच्या टप्प्यावर प्रेम व विश्वासासह संभोग असाच राहायला हवा. संभोग लग्नाच्या आधी की नंतर? की लग्नाशिवाय? एकाशीच की अनेकांशी? भिन्नलिंगी की समलिंगी? …हे प्रश्न अर्थातच गौण आहेत.

-    सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
___________________

आंदोलन, मार्च २०१६

http://www.samyaksanvad.com/काही-चर्चाः-स्त्री-पुरुष/