तुकारामांच्या मृत्युचा वा शारीरिक हत्येचा प्रश्न बाजूला ठेवला, तरी इतर मार्गांनी तुकारामांची हत्या करण्याचे अनेक प्रयत्न झाले, हे आपण आवर्जून ध्यानात घेतले पाहिजे.एखाद्याच्या व्यक्तित्वाला त्याच्या पूर्ण क्षमतेइतके फुलू न देणे, हीदेखील एक क्रूर हत्याच असते.
तुकारामांचे अभंग हादेखील त्यांच्या व्यक्तित्वाचा एक महत्त्वपूर्ण घटक होता. ते अभंग पाण्यात बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न हा देखील हत्येचाच एक प्रकार होय. तुकारामांचे तुकारामपण त्यांच्या अभंगातच आहे. अभंग बाजूला काढले, तरतुकारामांच्या अस्तित्वाचा अवघा फुलोराच झडल्यासारखा होईल. त्यामुळे या प्रकारची हत्या ही शारीरिक हत्येइतकीच आणि कदाचित तिच्यापेक्षाही अधिक गंभीर म्हणायला हवी.
तुकारामांच्या नावावर स्वतःचे अभंग, चरण वा शब्द घुसडणे, हा प्रकार तर अत्यंत क्लेशकारक होय. प्रचाराचीसाधने हातात असणारांनी हे फार घृणास्पद कार्य केले. यातील वाईच भाग म्हणजेत्यांचा हा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला. अन्नामध्ये मोहरीएवढे विष मिसळले तर सगळेच अन्न वाया जाण्याची वेळ येते, हे स्वतः तुकारामांचे उदगार या लोकांनी त्याच्याच वाङमयाला लागू करण्याचा क्लेशकारक प्रकार या रुपाने अमलात आणला.
प्रक्षेप हे अत्यंत क्लेशकारक असे एक वाङमयीन प्रदूषण आहे.
तुकारामांच्या अभंगात काही जणांनी जाणीवपूर्वक प्रक्षेप केले, काही जणांनी स्वतःलिहिलेले अभंग 'तुका म्हणे'असे शब्द घालून स्वतःच्या नावावर खपवले, तर काही वेळा तुकाराम हे नाव असलेल्या इतर कवींनी लिहिलेले अभंगही संततुकारामांचे मानले गेले.
संत तुकारामांखेरीज तुकारामविप्र, तुका सुंदर, तुका वर्दे, तुका नागनाथ, तुका ब्रह्मानंद असे तुकाराम नावांचे इतरही काही कवी होऊन गेल्याचे पांगारकर वगैरेंनी नोंदवले आहे.
तुकोबांच्या हयातीतच त्यांच्या अभंगात नाही नाही त्या गोष्टी घुसडण्याचा आणि काही वेळात्यांचे अभंग स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रकार चालू झालेला होता. सालोमालो नावाच्या व्यक्तीने हा प्रकार सुरु केलेला होता, अशी माहितीतुकारामांच्या एका अभंगातूनच उपलब्ध झाली आहे.
दिशाभूल करणारा अन्वयार्थ लावणे हीही हत्याच.
संत तुकारामांनी धार्मिक क्षेत्रातील असंख्य बाबींवर आपली असंख्य बाबींवर आपली अत्यंत परखड मते मांडली होती. धार्मिक क्षेत्रातील प्रस्थापित मुल्यांवर त्यांनी जोरदार टीका केली होती. भावशून्य अशा भाकड कर्मकांडांवर त्यांनी धारदार शब्दांची शस्त्रे चालविली होती. निष्कपट अंतःकरणातील सच्च्या भावनेवर आणि माणुसकीवर आधारलेला असा जणू काही एक पर्यायी धर्मच त्यांनी उभा केला होता. त्यांनी केलेल्या या विद्रोहामुळे त्यांचा अपार छळ झाला.
तुकारामांच्या विचारांचे जतन करण्यासाठी जी अनेक पावले उचलायची, त्यापैकी ‘शब्दांचा प्रभावी वापर’ हे आहे. शब्दाचे सामर्थ्य व त्याच्या मर्यादा यांचे अचूक भान, हा तुकारामांच्या व्यक्तिमत्वाचा कणा आहे. शब्दाचे सामर्थ्य आणि माहात्म्य सांगणारा त्यांचा एक अभंग हा भारतीय साहित्यामधील अक्षरशः अद्वितीय, अतुलनीय ठेवा आहे, असे म्हणावे लागेल. या अभंगातील त्यांचे विचार असे; “आमच्या घरी शब्दाची रत्ने हेच धन आहे. आम्ही शब्दाच्या शस्त्रांनीच प्रयत्न करू. शब्दाच्या माध्यमातून आम्ही लोकांना संपत्तीचे वाटप करू. शब्द हाच देव आहे आणि त्या देवाची पूजा व गौरव करण्यासाठी आम्ही शब्दांचेच साधन वापरू”.
इतिहासग्रंथांच्या पानापानावर या देशात झालेली महायुद्धे गडप करण्यात आली आहेत. मोठमोठे संघर्ष झाकून तरी टाकण्यात आलेत, वा बोथट तरी करण्यात आलेत. प्रत्यक्ष तुकारामांनी केलेल्या संघर्षाच्या बाबतीतही नेमके हेच करण्यात आले आहे. जणू काही त्यांनी संघर्ष केलाच नाहीनाही, जणू काही ते परंपरेच्या प्रवाहात निमूटपणे सामील झाले, त्यांनी केवळ टाळ कुटण्यातच धन्यता मानली, असे त्यांचे चित्र रेखाटण्यात आले आहे. ही सारी शब्दांची माया आहे. शब्दाची किमया आहे. हा शब्दसत्तेचा प्रभाव आहे. तुकोबांची प्रतिमा शब्दांच्या तुरुंगातून सोडवली पाहिजे.
विचारांची कत्तल हि शारीरिक हत्येपेक्षाही अधिक भयंकर, अधिक हानिकारक असते. शरीर काय, आज आहे - उद्या नाही. तुकाराम बेचाळीसाव्या वर्षी मरण पावले नसते, तर बहात्तराव्या वर्षी, नाहीतर ब्याण्णवाव्या वर्षी अथवा आणखी थोड्या काळाने मरण पावलेच असते. मृत्यू अटळच आहे. माणूस कितीही मोठा असला, तरी त्याच्या शरीराला निसर्गाची बंधने ओलांडता येत नाहीत. विचारांच्या बाबतीत मात्र असे नाही. विचाराची योग्य रीतीने जपणूक केली, तर ते प्रदीर्घच नव्हे तर अनंत काळपर्यंतही टिकू शकतात, काळावर मात करू शकतात. अर्थात त्यांची जपणूक केली नाही तर मात्र ते नष्ट वा भ्रष्ट होऊ शकतात. एखाद्याचे विचार अशा रीतीने नष्ट वा भ्रष्ट होणे, म्हणजे त्यांचे अवघे जीवितकार्यच संपुष्टात येणे होय. त्यांच्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ उद्देशच पराभूत होणे होय. म्हणून तुकारामांसारख्या महामानवांचे विचार जपणे ही आपली जबाबदारी आहे.
असंख्य तुकाराम आमच्या भारतीय भूमीतून जन्माला यावेत आणि आपल्या समाजाला त्यांनी प्रकाशाने उजळून टाकावे, हे आपले स्वप्न आहे. कधी काळी आपले हे स्वप्न साकार झाले आणि आपण आपल्या समाजरचनेत एक परिपूर्ण संतुलन कायमचे निर्माण करू शकलो, तर मग कोण तुकारामांना कधी विद्रोह करण्याची आवश्यकताच भासणार नाही...
मात्र तोपर्यंत विद्रोही तुकाराम हवेतच...
No comments:
Post a Comment